१९८४ पासून सुरू झालेला श्रद्धेचा, विश्वासाचा आणि सर्वांगीण प्रगतीचा गौरवशाली प्रवास
श्री क्षेत्र माहूरगड येथील कुलस्वामिनी माता रेणुकेचे हे पावन ठाणे
मंदिर उभारणीची कहाणी सुरु होते १९८४ पासून. या वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला रेणुकामातेची स्थापना एका साध्या चौथऱ्यावर झाली, हळूहळू मंदिर आकाराला येत गेले. १९ ऑगस्ट १९८५ रोजी “श्री रेणुकामाता सार्वजनिक विश्वस्त निधी मंडळ” अस्तित्वात आले.
श्री क्षेत्र सोनईचे भगवती उपासक प. पू. ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामीमहाराज अर्थात पू. अण्णामहाराज यांनी १९८९ मध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा करून देवीचा भव्य तांदळा निर्माण केला, अतिशय रेखीव असा हा तांदळा जणू माहूरगडाच्या मातेची प्रतिकृती ! या थोर संतांच्या पावन स्पर्शाने परिसर आनंदून गेला आणि मंदिर देवस्थान भाविकांसाठी श्रद्धेचे - विश्वासाचे आणि शांतचित्ताचे एक पावन स्थळ झाले.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला साध्या चौथऱ्यावर स्थापना, १९ ऑगस्ट १९८५ रोजी मंडळाची रीतसर नोंदणी, आणि १९८९ मध्ये पू. अण्णामहाराजांच्या हस्ते माहूरगडाच्या मातेसारख्या रेखीव तांदळ्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा.
१९९६ मध्ये मंदिराशेजारील छोट्या जागेत कालभैरवनाथ मूर्ती स्थापन झाली. २०१२ मध्ये कालभैरवनाथ मंदिराचा भव्य जीर्णोद्धार, बांधकाम पूर्ण झाले व नवीन घडविलेल्या मूर्तीची सर्व विधी, शोभायात्रा व मिरवणुकीसह प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार नवीन विश्वस्त निधी मंडळ अस्तित्त्वात आले. श्री. सतीशजी वैद्य यांची कार्यकारिणी अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि मंदिराच्या अभूतपूर्व प्रगतीला आरंभ झाला. श्री रेणुकेच्या मुख्य मूर्तीला शेंदुरलेपन व महाअभिषेक करून मंदिर सेवेची यथोचित सुरुवात करण्यात आली.
संपूर्ण गाभारा २०० किलो चांदीच्या कलाकुसरीने सजला, सुंदर नक्षीकामाला शुभचिन्हांची साथ दिली गेली. देवीच्या उजवीकडच्या भिंतीवर साडेतीन शक्तिपीठातील अन्य देवता (तुळजाभवानी, करवीर वासिनी आणि सप्तश्रुंगी) चितारण्यात आल्या तर डावीकडे भगवान परशुराम आणि प. पू. अण्णामहाराज यांच्या प्रतिकृती कोरल्या गेल्या. या रुपेरी गाभाऱ्याची चर्चा सर्वदूर झाली.
चांदीच्या गाभाऱ्यावर सोन्याचा पत्रा बसविण्याचे काम पूर्ण झाले आणि मंदिराला नवतेज प्राप्त झाले. अध्यक्ष श्री. सतीश वैद्य आणि कार्यकारिणीने शिस्त, स्वच्छता, अखंड अन्नदान आणि सुरक्षेसाठी २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले, ज्याची दखल घेऊन पोलीस विभागाने मंदिराला प्रशस्ती पत्र देऊन गौरविले.