एकाच छताखाली समाज, आरोग्य, शिक्षण आणि सेवा कार्यांचा संगम - लवकरच लोकार्पण !
श्री रेणुकामाता मंदिराशेजारी तळमजल्यासह चार मजली संकुल उभारण्यात आले असून त्याचे लवकरच लोकार्पण होत आहे. मराठवाड्यातील हे एकमात्र असे संकुल राहील, जिथे एकाच छताखाली विविध समाजोपयोगी उपक्रम निरंतर राबविले जातील.
यासाठी सिडको (CIDCO) कडून मंदिर विश्वस्तांनी मंदिराशेजारील जागेची रीतसर खरेदी केली, त्यानंतर या भव्य प्रकल्पाची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली, ज्याला आता मूर्त स्वरूप आले आहे. या समाजोपयोगी प्रकल्पाकरिता महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने महत्त्वपूर्ण योगदान दिले गेले आहे.
ग्रामीण भागातून विविध रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात पोषक भोजन सुविधा, तसेच गरजूंसाठी नियमित अन्नछत्र.
नियमित वैद्यकीय तपासणी केंद्र, प्राथमिक उपचार सुविधा, विशेषज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि अल्पदरात औषधोपचार सल्ला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वर्तमानपत्रे, वाचनालय, आरोग्य संवाद आणि आपुलकीचे हक्काचे व्यासपीठ.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासासाठी शांत, सुसज्ज अभ्यासिका दालन आणि संदर्भ ग्रंथालय.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, गृहउद्योग मार्गदर्शन व स्वयंरोजगार कक्ष.
लहान मुलांवर मूल्याधारित संस्कार घडविण्यासाठी वर्ग, तसेच नागरिकांसाठी नित्य योगा व प्राणायाम सत्रे.